Mahavitaran Technician Got Ph. D. Degree
प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सांगावी अशी यशोगाथा.
काम मिळविण्याकरिता शिक्षण घेणे हे आपण सर्वांनी ऐकले आहेच पण काम करता करता शिक्षण पूर्ण करणे (तेही Ph. D.) याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे आजची ही यशोगाथा.
“मला कौटुंबिक अडचण होती….. आर्थिक अडचण होती……. माझ्यावर परिवाराची जबाबदारी लवकर आली…. म्हणून मी माझे उच्च शिक्षण पूर्ण करू शकलो नाही.” अशी कारणे आपल्या आजूबाजूला ऐकायला मिळतात. पण या सर्वाना मात करून, एका क्षणाला “आता काहीच होऊ शकत नाही” अश्या टोकाच्या निर्णयावर आल्यानंतरही, येणाऱ्या प्रत्येक अडचणीला पार करत करत, काम करताना शिक्षण पूर्ण करणारे उदाहरणे बोटावर मोजण्याइतकेच. त्याचेच जिवंत उदाहरण म्हणजे आजची ही यशोगाथा.
आपल्याही आजूबाजूला अश्या यशोगाथा असेल तर संपर्क करा –
एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर कारणे न दाखवता ती मिळवण्याकरिता करावे लागणाऱ्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केले कि ती आपल्याला मिळतेच.
महावितरण मध्ये आय. टी. आय. या शैक्षणिक अहर्तेवर विद्युत सहायक पदावर रुजू होवून तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ अश्या पदावर काम करताना समाजकार्य विषयामध्ये Ph. D. पदवी मिळविण्याची कमाल करून दाखवली प्रदिप सदाशिव निंदेकर या तांत्रिक कर्मचाऱ्याने.
निंदेकर हे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील उदासा नावाच्या छोट्याश्या खेडेगावाचे रहिवासी. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले. त्यानंतरचे १२ वी पर्यंतचे शिक्षण गावापासून ०९ किलोमीटर लांब तालुक्यातील जीवन विकास विद्यालयातून झाले. २००० साली १२ वी झाल्यानंतर पुढे काय शिक्षण घ्यायचे याची माहिती नव्हती, मोठ्या भावाने आय. टी. आय. ला प्रवेश करून दिला. पण साधा फोन ची सोय नसलेल्या काळात त्यांनी मानसशास्त्र हा विषय शिकता यावा म्हणून BSW (Batcheler of Social Work) करिता ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालय, उमरेड यथे प्रवेश घेतला आणि पुढे MSW (Master of Social Work) चे शिक्षण पूर्ण केले.
पण हे पाच वर्षाचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता त्यांना तब्बल दहा वर्षे लागली. कारण मध्यंतरीच्या काळात अप्रेंटीस, कौटुंबिक – आर्थिक कारणे, मोठ्या भावाचे अपघाती निधन अश्या बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले.
बारावी नंतर चे पूर्ण शिक्षण कुटुंबावर अवलंबून न राहता स्वतः काम करूनच शिकायचे हा निश्चय मनाशीच बांधला होता. पदवीचे शिक्षण घेत असताना वेळ मिळेल तेव्हा इलेक्ट्रिक फिटिंग ची कामे केली, पानटपरी वर काम केले, खाली वेळेत मोठ्या भावांच्या ऑटो रिक्षाचे भाडे पण मारलेत, तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या ठिकाणी सामाजिक आणि व्यावसायिक सर्वेक्षांचे काम केले. जास्तीत जास्त काम महाराष्ट्रातील रेड लाईट एरिया मध्ये केले तसेच एच. आय. व्ही. एड्स च्या संदर्भात केले. वेळेअभावी आणि प्रवास जास्त करावा लागत असल्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास ट्रेन मधील प्रवासामध्येच केला. अश्याही परीस्थितीत ते चांगल्या मार्कांनी पास झाले. इथे शिकत असताना वेळ मिळेल तसे पथनाट्य, शिबिरे, संस्था भेटी, नाटक यामध्ये सहभाग घेणे सुरूच होते.
काही कारणाने MSW प्रथम वर्ष पास झाल्यानंतर दोन वर्षे शिक्षण थांबवावे लागले. पण नंतर MSW द्वितीय वर्षाकरिता नागपूर येथील कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायची वेळ आली तेव्हा Admission Fee भरण्याकरिता सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. पण त्यांचे जुने शिक्षक श्री. गारोडे सर यांनी प्रवेश मिळणार नाही या निराशेने परत जाणाऱ्या निंदेकर यांना विद्यार्थ्यांसमोर उभे करून, त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांना सांगून “असा विद्यार्थी आपल्या कॉलेज ला पाहिजे कि नाही ?” असा प्रश्न विचारून सर्वांच्या मदतीने फी नंतर भरण्याच्या अटीवर तिथे प्रवेश मिळवून दिला. पण या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट होती कि आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून IT Park नागपूर येथे ३२०० रुपये महिन्याने काम केले. जास्तीत जास्त वेळ शिक्षणाला देता यावा म्हणून खुपदा नाईट शिफ्ट मध्ये किंवा सेकंड शिफ्ट मध्ये काम करायचे किंवा फर्स्ट शिफ्ट संपवून दुपारी तीन च्या नंतर कॉलेज च्या लायब्रेरीमध्ये जावून बसायचे. अश्याप्रकारे कॉलेज आणि काम याची सांगळ घालताना तारेवरची कसरत करूनही प्रथम श्रेणीत पास झाले.
पण यानंतर पुढे काय ?
अर्थार्जन करणे गरजेचेच होते. म्हणून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम मधील उपजीविका तज्ञ या कंत्राटी पदाकरिता परीक्षा देवून कृषी विभाग हिंगणा, नागपूर येथे २०११ ते २०१४ या कालावधीत काम केले. या ठिकाणी तालुक्यातील एकूण ०७ प्रकल्पापैकी सर्वात जास्त म्हणजे १२ ग्रामपंचायत असलेले क्लस्टर त्यांच्या कडे होते म्हणजे जास्तीत जास्त शेतकरी आणि भूमिहीन कुटुंब.
शिक्षण घेताना आणि त्यानंतर या ठिकाणी काम करतानाच कॉलेजमार्फत विविध कार्यक्रमांत, ग्रामीण शिबीर, संस्था भेटी, किंवा इतर वेळीस आमंत्रित केल्या जात असे. आणि याच वेळी त्यांची भेट झाली समविचारी मित्र मैत्रिणीशी झाली, त्यांच्या सोबत मिळून विविध सामाजिक विषयावर पथनाट्य करणे, विविध कार्यक्रम आयोजित करणे असा क्रम सुरु झाला आणि त्यासोबतच सर्वांनी एकत्र येऊन सक्षम बहुउद्देशीय संस्था नावाच्या NGO ची स्थापना केली. आणि सोबतच PET (Ph. D. Entrance Exam) दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते पास झाले. २०१३ ला रजिस्ट्रेशन झाले, आणि एका नवीन स्वप्नाची आणि काम, वेळ, पैसा, अभ्यास, कुटुंब यातील कठीण नियोजनाची सुरुवात झाली.
त्यांना मार्गदर्शक मिळणे आणि विषय निवडणे याचीही मनोरंजक गोष्ट त्यांनी सांगितली. त्यांनी सांगिलते “एकदम खेडेगावातील आणि शरीरयाष्टीने एकदमच कृष, सामान्य चेहऱ्यामुळे कदाचित त्यांना मार्गदर्शक मिळण्यामध्ये खूपच त्रास होत होता. खूप ठिकाणाहून त्यांना नकार मिळालेला होता. एवढ्यातच माझी मैत्रीण शुभांगी या ज्या कॉलेज ला क्लर्क होत्या त्या कॉलेज मधील त्यांच्या प्रा. डॉ. नंदा पांगुळ याच्या यवतमाळ जिल्यातील खैरी या गावामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या शाळेमार्फत विद्यार्थ्याची प्रभात फेरी काढण्यात येणार होती. त्यात “स्त्री भ्रूण हत्या” या विषयावर पथनाट्य सादर करायचे होते. याचे आमच्या टीम ला आमंत्रण आले. ठरल्यानुसार आमची मुलामुलींची टीम दुचाकीने जवळपास तीन तासांचा प्रवास करून त्या गावात पोहचली दिवसाचा या कार्यक्रमात ०४-०५ वेळा पथनाट्य सादर केले. हे झाल्यानंतर आम्हाला मुक्काम करावा असे सुचविण्यात आले. रात्री गावात जेवण आणि भारुडाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही पण थांबलो. जेवणे होण्याअगोदर आम्ही सार्वजनिक मंडळाच्या माईक वर अमोल या मित्राच्या वडिलांचे रेकॉर्ड केलेले भजन लावले. यामुळे गावातील लोकांना वाटले की नागपूर वरून भजनी मंडळ आले आहे. जेवण झाल्यानंतर आमची त्याच मोठ्या वाड्यात आतमध्ये झोपण्याची तयारी सुरू होती. इकडे बाहेर लोकांची गर्दी जमा झाली. आणि आम्हाला वेळेवर आमचे काही प्रयोग असतील तर सादर करण्याची विनंती करण्यात आली. प्रवासामुळेआणि दिवसभराच्या धावपळीने थकलेल्या आमच्या कुणाचीही शारीरिक आणि मानसिक तयारी नव्हती. पण विनंतीला मान देवून डोळे चोळतच एखादे १० मिनिटाचे नाटक सादर करू असे ठरवून आम्ही बाहेर आलो तर मधोमध सादरीकरण आणि भोवताली लोकांची गर्दी अशी व्यवस्था दिसली.
स्वच्छतेवर एक नाटक सादर केले तर लोकांकडून आणखी काही सादर करण्याची विनंती करण्यात आली. मग आमचे आवडते “रावण अपहरण” हे स्त्री शसक्ती करणावरील विनोदी नाटिका आणि माझे व्यासनाविरोधातील एकपात्री नाटक सादर केले. हे लोकांना एवढे आवडले कि अक्षरशः त्यांचे हसून हसून पोट दुखायला लागेल. आमचे कार्यक्रम रात्री जवळपास १२.३० ला संपल्यानंतर शेतातून काम करून आलेल्या महिलांचे भारुड होते. पण ते आमच्या समोर सादर करायला लाजत होते. आम्ही विनंती केल्यावर त्यांनी मनोरंजनात्मक, उपदेशपर, एकदम सुंदर असे भारुड सादर केले. दिवसभर शेतात काम केल्यानंतर आणि उद्या सकाळी पण शेतावर जायचे असूनही त्यांचा जोश हा वाखाणण्याजोगे होता. त्यांचा उत्साह बघून शेवटी शेवटी अर्धा ते एक तास आम्ही सर्वांनी हातात टाळ घेवून त्यांच्या भारुड भजनात तल्लीन होवून सहभाग घेतला, त्यांच्या सोबत फेरा धरून नाचलो. आणि हेच बघून कदाचित विनंती केल्यानंतर प्रा. डॉ. नंदा पांगुळ यांनी मला त्यांचा विद्यार्थी म्हणून स्वीकारले आणि एकपात्री नाटक बघूनच विषयाची पण निवड करून दिली.” विषय – “विदर्भातील ग्रामिण भागातील विवाहित मद्यपी व्यक्तींच्या मद्यपानाचा त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक जीवनावरील परिणाम आणि समाजकार्य मध्यस्थी” (विशेष संदर्भ : वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्हातील निवडक गावे) या विषयवार शोधप्रबंध सादर करण्यात आला.
निंदेकर यांच्या म्हणण्यानुसार जीवनात ट्विस्ट येणार नाही आणि सरळमार्गी सर्व कामे होवून जाईल याची अपेक्षा करणे त्यांनी आता सोडून दिली आहे. हे सर्व सुरु असताना मे २०१४ मध्ये लग्न झाले आणि ऑगष्ट २०१४ मध्ये महावितरण, कळवा, ठाणे, मुंबई येथे विद्युत सहायक या पदावर नियुक्ती झाली. म्हणजे घरापासून जवळपास ९०० किलोमीटर लांब, एकदम नवीन शहरात. शासकीय नियमानुसार पहिले तीन वर्षे ६५००-७५००-८५०० या मानधनावर काम करावे लागले. म्हणजे आधीच्या पगारापेक्षा बराच कमी पगार. पत्नी ला सोबत घेवून येवढ्या मोठ्या शहरात राहून कुटुंब चालवणे याची आपण कल्पना करू शकतो. हेच काय कमी होते कि काय, या काळात मुंबई मध्येच पत्नीच्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. त्यातही दुसऱ्या ऑपरेशन च्या वेळेस कुटुंबातील कुणीही सोबत नसताना दोघांनाच याची जबाबदारी पार पाडावी लागली. हे सांगताना निंदेकर हे भूतकाळात जाऊन ते दुःख यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. या सर्व समस्यांमध्ये Ph. D. चे स्वप्न कुठेतरी मागे पडले. आणि कदाचित ते जन्मात पूर्ण होऊ शकत नाही असेही वाटायला लागले.
कारण कामाच्या ठिकाणी पण त्यांच्या शाखेतील कामाच्या दृष्टीकोनातून सर्वात वाईट समजला जाणारा आणि सर्वात मोठा एरिया त्यांना मिळाला होता. कामाच्या वेळेचा काही ताळमेळ नव्हताच. पण ईश्वराने नेहमीप्रमाणे आपल्याकरिता जास्त कामाची सोय करून ठेवलेलीच असेल, आता आपल्याला कठीणात कठीणच काम करावेच लागेल हि मानसिकता बनलेली होती. त्याचाही त्यांनी आनंदाने स्वीकार केला आणि आनंदाने आणि मिळून मिसळून काम केले. आजही त्या ठिकाणावरून ते बदली करून दुसऱ्या ठिकाणी गेले तरी या एरियातील लोक त्यांना विसरले नाही. छोट्या मोठ्या घरगुती कार्यक्रमात, शाळेतील कार्यक्रमात सुद्धा लोक अजूनही त्यांना आमंत्रित करतात. पण निंदेकर गर्वाने आणि आनंदाने सांगतात त्यांना या ठिकाणी काम करताना मिळालेले अधिकारी आणि सहकारी कर्मचारी यांनी खूपच मदत केली. त्यांचे उपकार ते जन्मभर विसरू शकत नाही.
पण यात Ph. D. चा विसर पडलेला होता. एकदा नागपूरला काही कामानिमित्त गेल्यानंतर त्यांचे एक शिक्षक प्रा. श्री.फोफसे सर यांची एक भेट झाली. त्यांना सर्व परिस्थिती माहिती होती. त्यांनी फक्त अर्धा तास चर्चा केली आणि कुठेतरी विस्मरणात गेलेले शिक्षण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचे आहे, आणि ते होऊ शकते हे सांगून नवीन उर्जा निर्माण केली. आणि झाली पुनःश्च सुरुवात. इकडे महावितरण ला कायमस्वरूपी कामाची ऑर्डर (Permanent Order) मिळालीच होती म्हणजे पगार वाढलेला होताच. म्हणजे एक प्रश्न सुटलेला होताच. मग सुट्ट्यांचे दिवस बघून Data Collection आणि इतर कामे सुरु केली. शिफ्ट सांभाळून एका दिवसाच्या साप्ताहिक सुट्टी मध्ये नागपूरला १२ तासांकरिता १४ + १४ असा येण्याजानाचा २८ तासांचा प्रवास करून अभ्यास आणि काम याचे नियोजन करणे सुरु झाले. आणि शेवटी जानेवारी २०१९ मध्ये शोधप्रबंध तयार करून सादर केला. आणि आपल्याला सर्वाना त्रासदायक अश्या कोरोनाचे आगमन झाले, त्यामुळे परत उशीर झालच आणि शेवटी मे २०२२ ला Ph. D. पदवी प्रदान करण्यात आली.
सध्या ते नीलम नगर मुलुंड या ठिकाणी कार्यरत असून ही बाब जेव्हा त्यांच्या सहकारी आणि अधिकारी वर्गाला कळली तेव्हा त्यांना याचा आश्चर्य आणि आनंद झाला. त्यांच्या काही सहकारी आणि अधिकारी वर्गाशी संपर्क करण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले की, दैनंदिन जीवनात त्यांच्या वागण्याच्या आणि काम करण्याच्या शैलीवरून कुणीही म्हणू शकणार नाही कि हि व्यक्ती सदर पदवी घेत आहे किंवा घेतली आहे. कमालीचा साधेपणा त्यांच्या वागण्यात दिसून येतो. त्याचे सहायक अभियंता श्री. सरवदे यांनी तर निंदेकर यांचे भरभरून कौतुक केले. वेळेचे नियोजन आणि सदुपयोग कसा करायचा हे निंदेकर यांचे कडून सर्वांनी विशेषतः युवा विद्यार्थी वर्गाने शिकायला पाहिजे असे ते बोलले.
श्री. सरवदे यांनी एक बाब अगदी प्रकर्षाने सांगितली कि जेव्हा करोना काळातील लॉकडाऊन संपला आणि महावितरण मध्ये वसुलीचे काम जोरात सुरु झाले त्याच काळात निंदेकर याच्या पत्नीला प्रेग्नेन्सीमध्ये दवाखान्यात Admit केले व यात त्याचे दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला पण ते दोन्ही बाळ वाचू शकले नाही. अश्याही परिस्थिती महावितरणप्रती कामाचे कर्त्यव्य आणि कौटुंबिक जबाबदारी या दोन्ही सुट्टी न घेता योग्यरीत्या पार पाडली. अश्या भयंकर कौटुंबिक समस्येत कमालीचे मानसिक स्थैर्य राखणे हे सर्वाना जमत नाही, हे कुठून विकतही घेता येत नाही, हे येते निरंतर आणि अवांतर वाचनातून, जे निंदेकर या काळातही निरंतर करत असतात. संयम, मानसिक श्यैर्य, अधिकारी वर्गाबरोबरच वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकारी कर्मचारी, ग्राहक याचे बरोबर नेहमी नम्रतेने वागणे याचे विशेष कौतुक केले.
श्री. भणगे साहेब, कार्यकारी अभियंता, मुलुंड यांना जेव्हा त्यांच्या एका तांत्रिक कर्मचाऱ्याने समाजकार्य विषयात Ph. D. पदवी मिळवली हे जेव्हा कळले तेव्हा न राहवून रात्री ११.३० वाजता फोन करून अभिनंदन निंदेकर यांचे केले आणि इतरही अधिकारी वर्गाला कळविले. आणि दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी त्यांच्या कार्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन केले. तेथे मनोगत ऐकून घेऊन भरभरून कौतुक केले. News Channel आणि वर्तमान पत्राला मुलाखत देताना त्यांनी निंदेकर यांनी हि पदवी मिळवली याचा त्यांना आणि महावितरणला अभिमान आहे सांगितले आणि त्यांच्या पुढील आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.
निंदेकर यांना बरेच लोक म्हणतात आतातर बस झाले ना ? पण निंदेकर यांच्या म्हणण्यानुसार महावितरण ला प्रामाणिक पणे सेवा देत असताना या शिक्षणाचा उपयोग समाजाकरिता कसा करता येईल याचे प्रयत्न सुरु ठेवतील. समाजाप्रती आपले काही देणे लागते, या वसुंधरा माते प्रती आपले दायित्व समजून घेवून “सक्षम ग्रुप” द्वारा समाजउपयोगी बरीच कामे केली जातात ती पुढे कशी नेता येईल आणि त्याचा विस्तार कसा करता येईल या करिता ते आता प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांकरिता काही संदेश द्या अशी विनंती केल्या नंतर त्यांनी काही मुद्दे सांगितले.
त्यांनी सर्वप्रथम मोबाईल हा दुधारी तलवार आहे असे म्हटले. मोबाईल च्या चुकीच्या आणि अती वापराविषयी चिंता व्यक्त केली, फक्त मोबाईल ला दोष न देता त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीच्या वापरला दोष दिला. ज्या काळात साधा फोन नव्हता त्याही काळात लोक शिक्षण घेत होते. या काळात एका क्लिक वर सर्व माहिती तुम्हाला लगेच कळते त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. महत्वाचे म्हणजे मोबाईल च्या निरंतर वापरामुळे म्हणजे विविध Game, मनोरंजनाचे विडीवो यातच जास्त वेळ घालवत असल्यामुळे एकाग्रता कमी होवून उद्याची चिंता किंवा विचार न करणे आणि आजच्या मनोरंजनावरच खुश राहणे याचे प्रमाण वाढले आहे. आजचा जास्तीत जास्त विद्यार्थी वर्ग हा फोकस नाही. त्याचे भविष्याचे नियोजन नाही. जेव्हा त्यांना टार्गेटच माहित नाही तर त्याचा मार्ग कसा ठरणार. सोशल मिडिया च्या माध्यमातून कधीही न परत येणारा वेळ, विचारक्षमता, मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा ऱ्हास करून घेत आहे. याकरिता योग्य ते मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.
देशाच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त करताना त्यांनी सांगिलते कि “आपल्या भारत देशात १५ ते २९ वयोगटातील युवावर्ग एकूण लोकसंख्येच्या ३४ % आहे. या युवा पिढीच्या योग्य मार्गक्रमनावरच, या युवा पिढीच्या वाटचालीवर देशाची प्रगती अवलंबून आहे. नुकतीच केंद्र सरकार द्वारा National Youth Policy 2021 च्या Revised Draft मध्ये काही सूचना शिफारशी सुचविण्याकरिता यशवंतराव चव्हाण प्रठीष्ठान, मुंबई येथे खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनखाली झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. आमच्या ग्रुप मध्ये “Social Justice” या विषयावर चर्चा करून दहा वर्षाच्या या Policy करिता काही शिफारशी सुचविण्यात आल्या.”
निंदेकर यांनी सांगितले कि खंत या गोष्टीची आहे कि ज्या युवा वर्गाकरिता केंद्र सरकार द्वारा National Youth Policy बनविण्यात येत आहे त्याच युवा वर्गाला याविषयी पाहिजे तशी किंवा काहीच माहिती नाही. याच Policy वर आपल्या भारत देशाचे भवितव्य अवलंबून आहे. आशा आहे कि ऑगष्ट महिन्यापर्यंत ही National Youth Policy केंद्र सरकार द्वारा पास होईल. महत्वाचे हे आहे कि ही Policy तयार झाल्यानंतर योग्य प्रकारे कश्या प्रकारे कार्यान्वित होईल याकरिता लक्ष देणे.
श्री. निंदेकर यांनी यशाकरिता आई, वडील, कुटुंबीय, मित्रमंडळी, गावकरी तसेच महावितरणचे सहकारी कर्मचारी, अधिकारी तसेच त्यांच्या मार्गदर्शिका प्रा. डॉ. नंदा पांगुळ, ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे सर्व अशक्य होते या सर्वांचे यांचे आभार व्यक्त केले.
आपल्याही आजूबाजूला अश्या यशोगाथा असेल आणि सर्वांसमोर आणायच्या असतील तर संपर्क करा –
अश्या प्रकारे अकल्पित आणि आश्चर्यचकित करणारी महावितरणच्या निंदेकर या कर्मचाऱ्याची यशोगाथा विद्यार्थी वर्गाला, पालकांना आणि समाजाला प्रेरित करणारी आहे. कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना, कौटुंबिक शैक्षणिक Background नसताना, जीवनात येणाऱ्या कित्येक अडचणींना मात करत, हार न मानता संयम ठेवून निरंतर प्रयत्नाने यश मिळू शकते याचे हे अतिउत्तम उदाहरण आहे. रोजगार मराठी टीम तर्फे डॉ. श्री. प्रदीप सदाशिव निंदेकर यांच्या भावी आयुष्याकरिता खूप खूप शुभेच्छा.
संपर्क क्रमांक – 9326030860